Sections

ऑस्कर माहात्म्य! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 6 मार्च 2018
oscar winners

यंदाच्या ‘ऑस्कर’ सोहळ्यात तंत्रमंत्र व आकृतिबंधापेक्षा आशयाला अधिक महत्त्व दिले गेल्याचा सुखद धक्‍का रसिकांना बसला. पुरस्कारविजेत्या चित्रपटांच्या नावाकडे एक नजर टाकली, तर आशयाला पर्याय नसतोच, हेच अधोरेखित होते.

यंदाच्या ‘ऑस्कर’ सोहळ्यात तंत्रमंत्र व आकृतिबंधापेक्षा आशयाला अधिक महत्त्व दिले गेल्याचा सुखद धक्‍का रसिकांना बसला. पुरस्कारविजेत्या चित्रपटांच्या नावाकडे एक नजर टाकली, तर आशयाला पर्याय नसतोच, हेच अधोरेखित होते.

ऑ स्कर पुरस्कार सोहळ्याची संध्याकाळ अनेक अर्थांनी रंगीन असते, म्हणूनच चित्रकर्मी आणि रसिकांच्या दृष्टीनेही या सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोहळ्याचा मुहूर्त साधून अवघ्या जगतातली वलयांकित चित्रकर्मींची मांदियाळी तेथे एकवटलेली असते. फॅशनच्या मोहमयी दुनियेचे प्रखर प्रकाशझोत इतस्तत: फिरत असतात. प्रतिभावंतांची पावले तिथल्या लाल गालिचावर हलकेच उमटत असतात, सोहळ्याची खुमारी वाढवत असतात. शिवाय एक कलात्मक उत्कंठा, कलावंतानेच कलावंताला दाद देण्याची अनिवार ओढ, तृष्णा, हेवेदावे अशा भावभावनांचे रंगतरंग आणि त्यांच्या छटा इथे मौजूद असतातच. खरे तर ऑस्कर पुरस्कार हा काही चित्रपट क्षेत्रातील अखेरचा शब्द मानण्याचे काही कारण नाही. ‘ऑस्कर’च्या यादीत नसलेले असंख्य दर्जेदार आणि अप्रतिम चित्रपट जगभर तयार होत असतात आणि कला क्षेत्राची कमान अधिकाधिक उंच नेत असतात. ‘ऑस्कर’पेक्षाही अधिक कडक मोजपट्ट्या लावून चित्रपट आणि चित्रकर्मींचा सन्मान करणारे सोहळेही इतरत्र होत असतात; पण तरीही ‘ऑस्करचा महिमा वर्णावा किती’ हीच जगभरातील सर्वमान्य भावना राहिली आहे.

यंदाचा ९०वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसच्या भव्य डॉल्बी सभागारात शानदाररीत्या पार पडला. ‘ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्टस अँड सायन्सेस’ या संस्थेचा हा वार्षिक सोहळा असतो; पण पुरस्कार संस्थेच्या नव्हे, तर ‘ऑस्कर’ या लाडक्‍या नावानेच ओळखला जातो. संगणकाच्या युगात चित्रपटतंत्राने केवढ्या तरी भराऱ्या घेतल्या. त्याचे वेळोवेळी कौतुक होत गेले. यंदाच्या सोहळ्यात मात्र तंत्रमंत्र आणि आकृतिबंधापेक्षा आशयाला अधिक महत्त्व दिले गेल्याचा सुखद धक्‍का रसिकांना मिळाला. चित्रपट निर्मितीतले तंत्रज्ञानादी पैलू निर्विवाद महत्त्वाचे असतात, पण शेवटी ‘गोष्ट काय आहे?’ हाच प्रश्‍न मूलभूत असतो. यंदाच्या सोहळ्यात बाजी मारणाऱ्या चित्रपटांच्या नावाकडे एक नजर टाकली तरी निश्‍चित जाणवेल की आशयाला पर्याय नसतोच. या वर्षी ‘द शेप ऑफ वॉटर’ हा चित्रपट सर्वांत सरस ठरला, त्याचे कारणही आशय हेच होते. एक अनामिक उभयचर जळमाणूस आणि एक मुकी स्त्री यांच्यातील भावबंधांचा अलौकिक साक्षात्कार घडवणारा हा चित्रपट तंत्रातही चांगलाच उजवा आहे; पण गोष्टीने बाजी मारली. याच चित्रपटाचे दिग्दर्शक गुलर्मो देल तोरो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘हेलबॉय’ किंवा ‘पॅसिफिक रिम’सारखे अव्वल चित्रपट देणाऱ्या देल तोरो यांनी गडद आशयाची मांडलेली ही आधुनिक परिकथाच म्हणावी लागेल. त्यापुढे दिग्दर्शनात ज्याचा सर्वत्र डंका वाजतो, त्या क़्रिस्तोफर नोलान यांचा ‘डंकर्क’ मात्र काहीसा मागे पडला. ‘डंकर्क’ला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले, दोन्ही ध्वनिमुद्रणाशी संबंधित म्हणजे तांत्रिक आहेत. ‘डार्केस्ट आवर’मध्ये विन्स्टन चर्चिल यांची भूमिका साकारणारे गॅरी ओल्डमन सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग मिसूरी’ या लांबलचक नावाच्या चित्रपटात प्रमुख व्यक्‍तिरेखा साकारणाऱ्या फ्रान्सेस मक्‍डोर्मंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या. हे दोन्ही सर्वोत्कृष्ट अभिनेते साठीच्या उमरीत आले आहेत, ही बाब ध्यानी घेतली पाहिजे! किंबहुना, यंदाच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. ग्लॅमर आणि गल्ल्यापेक्षाही इथे आशयाला अधिक वजन आहे, हेच ऑस्कर समितीने जणू अधोरेखित केले आहे. गतसाली ‘ला ला लॅंड’ या जगभरातल्या तरुणाईवर जादू करणाऱ्या चित्रपटाचा दबदबा सोहळाभर होता. तथापि, अंतिमत: नाट्यमय गफलतीनंतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाची ‘ऑस्कर’ची बाहुली ‘मूनलाइट’ या चित्रपटाला मिळाली होती, हे हॉलिवूडप्रेमींना नक्‍कीच आठवत असणार. यंदाचा सोहळा मात्र अशी कुठलीही गफलत न होता सुरळीत पार पडला. इतकेच नव्हे, तर गतसाली पुरस्काराची घोषणा करण्यात घोळ करणाऱ्या वॉरन बेट्टी आणि फे डुनवे या बुजुर्ग जोडीलाच यंदाही पुरस्काराची घोषणा करण्यासाठी पाचारण करून संयोजकांनी औचित्य साधले. गेल्या वेळची चूक दुरुस्त करण्याची अशी संधी देण्याचा संयोजकांचा उमदेपणा आणि कल्पकता जाणत्यांची दाद घेऊन गेला नसता तरच नवल. सोहळ्यांच्या सायंकाळी पुरस्कर्त्यांची यादी वाचण्यात निम्मी संध्याकाळ बरबाद करणारे आपल्याकडचे पुरस्कार सोहळे असा कल्पक उमदेपणा कधी आयात करणार, याची वाट पाहणे तेवढे आपल्या हाती आहे.

Web Title: editorial oscar winners 2018

टॅग्स

संबंधित बातम्या

question answer
प्रश्नोत्तरे

माझा मुलगा एक महिन्याचा आहे. मात्र, मला दूध योग्य प्रमाणात येत नाही. त्यामुळे मुलाचे पोट व्यवस्थित भरत नाही. तरी कृपया दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी...

Balaji-Tambe
अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

शुक्र यथाव्यवस्थित राहण्यासाठी शुक्ररक्षण महत्त्वाचे असते, तसेच शुक्रपोषक आहार-रसायनांचे सेवन करणेही महत्त्वाचे असते. ब्रह्मचर्याचे पालन करताना या...

baramati.
बारामतीत जागतिक शांतता दिवस साजरा

बारामती शहर - सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने आज बारामतीत जागतिक शांतता दिवस साजरा केला गेला. सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या फ्रान्स देशाचे सदस्य...

Alzheimer
अल्झायमर (स्मृतिभ्रंश)

मेंदूत साठविलेल्या माहितीची फेररचना करणे आवश्‍यक असते. आज केस विंचरले, तरी दुसऱ्या दिवसापर्यंत केसांमध्ये पुन्हा गुंता तयार होतो. गुंता झालेले केस...

arun-jaitley
राहुल हे ‘विदूषक युवराज’

नवी दिल्ली - ‘राफेल’ विमान खरेदी सौदा व बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए) यावरून सरकारवर आक्रमक प्रहार करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना दिवसेंदिवस वाढत...