Sections

पुणे : राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत उड्डाण पूल 

अनिल सावळे, जागृती कुलकर्णी  |   रविवार, 11 मार्च 2018
File photo of Traffic on Sinhgad Road

सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तुमच्याकडे एखादी प्रॅक्‍टिकल कल्पना आहे? मग लिहून काढा तुमची कल्पना आणि पाठवा webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर! 

पुणे/ धायरी : सिंहगड रस्त्यावरून जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आनंदनगर चौकात उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद केली आहे.

राजाराम पुलाच्या पुढे विठ्ठलवाडी कमानीपासून थेट फनटाइम थिएटरजवळ कॅनॉलच्या रस्त्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीचा हा पूल असेल. येत्या एप्रिल महिन्यापासून या पुलाच्या उभारणीसाठी प्रारूप आराखडा, निविदा प्रक्रियेची कामे सुरू होतील. 

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही या भागातील नागरिकांची मोठी समस्या आहे. या रस्त्यावर अतिक्रमणे वाढली आहेत. वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेते, फळविक्रेते आणि इतर पथारी व्यावसायिक आहेत. त्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सारसबागेपासून सुरू होणारा सिंहगड रस्ता थेट सिंहगडापर्यंत जातो.

सिंहगडाकडे जाताना राजाराम पुलाच्या पुढे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिकच भेडसावतो.

राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव धायरी ही लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणारी ठिकाणे आहेत. त्यातही विठ्ठलवाडी, हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग या परिसरात पर्यायी रस्ते नाहीत. त्यामुळे येथील सर्वच वाहनांचा भार मुख्य सिंहगड रस्त्यावरच येतो. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या जास्त आहे. सिंहगड रस्त्यावर पर्यटकांची संख्याही जास्त असते. खडकवासला, पानशेत धरणाच्या परिसरातील गावांत मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण होते, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांचीदेखील संख्या वाढली आहे. या सर्व बाबींचा विचार करता या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाण पूल उभारणे गरजेचे होते. 

आर्थिक तरतूद - 10 कोटी  या रस्त्यावरील वाहनांची संख्या - सुमारे आठ हजार (प्रतितास) 

वेळ आणि इंधनाची बचत  राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरात पाच चौक येतात. वाहनचालकांना या चौकांमधील वाहतूक कोंडीत अडकून न पडता सरळ जाता येईल. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होणार आहे. 

अशी जातील वाहने  हा उड्डाण पूल झाल्यास विठ्ठलवाडी, हिंगणे, विश्रांतीनगर, आनंदविहार, हिंगण्याच्या आतील भाग, आनंदनगर पूर्व-पश्‍चिम, सनसिटी रस्ता आणि माणिकबाग या भागातील वाहने पुलाच्या खालून प्रवास करतील. तर, माणिकबागेच्या पुढील वडगाव, धायरी, नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला आणि त्या पुढील सर्व भागांतील वाहनचालक पुलावरून प्रवास करतील. 

पाच चौकांची कोंडीतून मुक्तता  विश्रांतीनगर, हिंगणे, आनंदनगर (भा. द. खेर चौक), माणिकबाग आणि माणिकबाग डीपी रस्ता या पाच चौकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. तसेच, वडगाव आणि त्यापुढे जाणाऱ्या सर्व वाहनांनाही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागणार नाही. 

अंतर्गत रस्त्यांची कामे करावीत  हा पूल उभारण्यापूर्वी सनसिटी ते कर्वेनगर हा मुठा नदीवरील प्रस्तावित पूल, वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यानालगत बंद पाइपलाइनच्या बाजूने जाणारा रस्ता आणि अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामे करावीत. हे पर्यायी रस्ते उभारल्यानंतर या पुलाचे काम सुरू केल्यास नागरिकांसाठी अधिक सोयीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. 

सिंहगड रस्त्यावरील पुलाच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. येत्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल महिन्यापासून या पुलाच्या उभारणीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. प्रारूप आराखडा, निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्षात पुलाचे बांधकाम सुरू होईल.  - राजेंद्र राऊत, मुख्य अभियंता, पथ विभाग 

आनंदनगर चौकातील पुलासाठी महापालिकेने दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिंहगड रस्तावासीयांसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार असून, वाहनचालकांची कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.  - नगरसेवक श्रीकांत जगताप 

हा उड्डाण पूल होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी प्रारूप आराखडा, संकल्प रेखाचित्रे महापालिकेला सादर केली होती. विठ्ठलवाडी ते माणिकबाग असा पूल उभारल्यास भविष्यातील 25 वर्षांचा वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल.  - शैलेश चरवड, माजी नगरसेवक 

Web Title: marathi news pune news Sinhgad Road Traffic Jam funtime theatre

टॅग्स

संबंधित बातम्या

रुद्र खोबरे
सात वर्षांच्या रुद्रकडून अवघड तीन किल्ले सर

खडकवासला - चढाई-उतरणीला अवघड असलेल्या किल्ल्यांच्या यादीतील अलंग, मदन, कुलंग हे तीन किल्ले सर करीत सात वर्षांच्या रुद्र खोबरे या मुलाने ही मोहीम...

images.jpg
पुण्यात लेलँड कंपनीच्या गोडाऊनला आग; 15 लाखांचे नुकसान

पुणे : आंबेगाव बुदृक येथील अशोक लेलँड कंपनीच्या गोडाऊनला काल रात्री 1 वाजता आग लागली. या घटनेत 15 लाख रूपयांचे चारचाकी वाहनांचे सुटे भाग आगीच्या...

chember.jpg
सनसिटीत तुटलेली ड्रेनेजची झाकणे धोकादायक 

सिंहगड रस्ता : सनसिटी रस्त्यावर परमार फूड ते आशीष पार्क इमारतीजवळ रहदारी वाढली आहे. हर्षल हाइट समोरील ड्रेनेजची झाकणे तुटलेली आहेत. मोठ्या कार,...

bullet.jpg
पुणे: धायरीत बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ

पुणे : धायरीत बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे परिसरात जिवंत बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीकाळ भिती निर्माण झाली...

railway.
कर्जत-भिवपुरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे, वाहतूक दोन तास विस्कळीत

नेरळ - ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक कर्जत-भिवपुरी रोड दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने विस्कळीत झाली. गर्दीच्या वेळी...

Sinhgad-Institute
‘सिंहगड’च्या कर्मचाऱ्यांचा पगार दीड महिन्यात

पुणे - सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराबाबत धीर धरावा. हे पगार येत्या दीड महिन्यात हमखास दिले जातील...