Sections

...हा तर विनोदाचा "विजय' 

चिन्मयी खरे |   सोमवार, 30 एप्रिल 2018
vijay chavan

या वर्षीचा राज्यशासनातर्फे दिला जाणारा "व्ही. शांताराम जीवन गौरव' पुरस्कार विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत - 

या वर्षीचा राज्यशासनातर्फे दिला जाणारा "व्ही. शांताराम जीवन गौरव' पुरस्कार विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत - 

मला जेव्हा आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा फोन आला आणि त्यांनी फोनवर मला या वर्षीचा राज्य शासनातर्फे दिला जाणारा "व्ही. शांताराम जीवनगौरव' पुरस्कार मला दिला जाणार आहे हे सांगितलं, तेव्हा मी दोन मिनिटे स्तब्ध झालो होतो. मला काहीच कळेना. एवढा मोठा पुरस्कार प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपल्याला मिळावा, तो मला मिळाला याचा मला खूपच आनंद झालाय.

हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. त्याचं कारण म्हणजे माझे वडील. पूर्वीच्या काळी गाणारे नट लागायचे. त्या वेळी पार्श्वगायक नव्हते. त्या वेळी माझे वडील राजकमल स्टुडिओमध्ये फायनल ऑडिशनसाठी गेले होते. त्यांच्याबरोबर अशोककुमार होते. त्या वेळी त्या स्पर्धेत अशोककुमार निवडून आले. माझ्या वडिलांची शांताराम बापूंबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. मला जेव्हा हा व्ही. शांताराम यांच्याच नावे दिला जाणारा पुरस्कार मिळाला असं कळलं, तेव्हा मला या प्रसंगाची आठवण झाली. 

vijay chavan

आमच्या घरात माझ्या वडिलांमुळे नाटकाचं, अभिनयाचं वातावरण तयार झालं होतं. लालबाग-परळ भागात जेवढ्या स्पर्धा व्हायच्या, त्या सगळ्यांमध्ये माझे वडील दिग्दर्शक किंवा मुख्य अभिनेता म्हणून काम करायचे. माझा सख्खा मामेभाऊ सुधीर सावंत याने "दोस्ती' चित्रपटात आंधळ्याचं काम केलं होतं. त्यामुळे घरात आमच्या हे वातावरण होतंच. पण मला या दोघांची भयंकर चीड यायची. मी वडिलांना खूप बडबडायचो आणि तोंडाला रंग लावून स्टेजवर नाचताना, अभिनय करताना लाज नाही का वाटत? असं विचारायचो. त्यांनी मला तेव्हा कानाखाली मारली होती. मला मारून मुटकून ते एकदा तालमीलाही घेऊन गेले. पण मी तिथे बसून झोपून गेलो. कॉलेजमध्ये असतानाही मला या सगळ्यात रस नव्हता. पण मी नकला खूप छान करायचो. माझं पाठांतर आणि स्मरणशक्ती खूप दांडगी होती. अजूनही तशीच आहे. मला आजही चित्रपटाची पटकथा दिग्दर्शकाने वाचून दाखवली की मी थेट जाऊन सीन करून येतो. मला पटकथा पाहावी लागत नाही. 

मी रूपारेल कॉलेजमध्ये होतो तेव्हा कॉलेजचा सुवर्णमहोत्सव होता आणि तेव्हाच आमच्या कॉलेजच्या मुख्याध्यापिका निवृत्त होणार होत्या. त्यामुळे सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा, असं सगळ्यांनी ठरवलं होतं. मी ठरवलं होतं की मी नकला करणार. पण आमच्या सरांनी मला एकांकिका स्पर्धेची सगळी जबाबदारी तूच सांभाळ, असं सांगितलं. मी त्यांना म्हटलं, मी बाकी सगळं काम करेन; पण अभिनय नाही करणार. कॉलेजला खाली कॅंटीन आणि वर हॉल होता. मग वरून काही आणायला सांगितलं, की ते मी लगेच वर नेऊन द्यायचो. स्पर्धेच्या आदल्या दिवशी मी खाली कॅंटीनमध्ये बसलेलो असताना वरून जोरात आवाज आला आणि पाहतो तर काय; नाटकातल्या मुख्य अभिनेत्याचं काम करणारा मुलगा चक्कर येऊन पडला होता आणि रक्तबंबाळ झाला होता. मग आता हे काम करणार कोण? तर माझं नाव कोणीतरी प्राचार्यांना सुचवलं. मग त्यांनी मला विनवण्या केल्यानंतर मी काम करायला तयार झालो. कारण त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही मी ऐकलं नसतं. 

नाटक सुरू झाल्यानंतर दोन-चार मिनिटांतच प्रेक्षागृहात हशा पिकला आणि ते पाहून मला हुरूप आला. त्या नाटकासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिकही मिळालं. पारितोषिक मिळाल्यामुळे आपण अभिनय क्षेत्रात काम करू, असं मला वाटायला लागलं. त्याविषयी गोडी निर्माण झाली. मग मी "आविष्कार' या संस्थेत जायला लागलो. जयश्री गडकर यांनी मला एका गंभीर चित्रपटात घेतलं होतं. त्याचं नाव होतं "अशी असावी सासू'. या चित्रपटात मला घेतल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की विजय विनोदी अभिनेता आहे; मग त्यांना या चित्रपटात का काम दिलं? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, "सर्कसमधले जोकर असतात तसे विनोदी अभिनेते असतात. त्यांना सगळंच येत असतं. ते पडायचा, रडायचा सगळ्याचा अभिनय करू शकतात. त्यांना सगळं येतं.' या चित्रपटासाठी निळू फुले, पद्मा चव्हाण यांनी माझी पाठ थोपटली. असा माझा एकूण हळूहळू अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 

त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले आणि मी असे आम्ही चार विनोदी नेते होतो. पण आमच्यात स्पर्धा अशी कधीही नव्हती. लक्ष्या आणि मी तर खूपच चांगले दोस्त होतो. एकत्रही आम्ही बरंच काम केलं आहे. "मोरूची मावशी' हे नाटक मी एका स्पर्धेत केलं होतं. त्यानंतर "सुयोग'ने हे नाटक करायला घेतलं आणि मावशीची भूमिका लक्ष्याला ऑफर करण्यात आली. पण लक्ष्याने तिथं माझं नाव सुचवलं. त्यांनी माझे स्त्री-वेशातले फोटो पाहिले आणि लगेचच नाटकाची तालिम करायला सुरुवात केली. "पछाडलेला' हा लक्ष्याचा शेवटचा चित्रपट. त्या चित्रपटातही मी आणि त्याने एकत्र काम केलं होतं. रोज रात्री चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही आमच्या खोलीत गप्पा मारत बसायचो. लक्ष्या त्या शेवटच्या दिवसात माझ्याबरोबर होता. त्याची ही आठवण माझ्या कायम लक्षात राहील. 

Web Title: interview of vijay chavhan for v shantaram lifetime achievement award

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

pushakar.jpg
आंतरराष्ट्रीय पशू मेळाव्यास प्रारंभ

पुष्कर : आंतरराष्ट्रीय पशू मेळाव्यास शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला. भारतासह जगभरातून पर्यटकांनी उपस्थिती लावली.  मेळा मैदानात...

'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'

हिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...

नाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी 

अंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...

Alyque Padamsee
अॅडगुरु अॅलेक पद्मसी यांचे निधन

मुंबई : अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी (वय 90) यांचे आज (शनिवार) मुंबईत निधन झाले. 'गांधी' या 1982 मध्ये आलेल्या ऐतिहासिक...

eco-cycle.jpg
जुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप 

पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...