दाक्षिणात्य राज्ये मातृभाषेसाठी आग्रही असताना मुंबापुरीतील केंद्रीय आस्थापनांमध्ये; उदा. बॅंका, रेल्वे येथे मराठीचे अस्तित्व दाखवण्यासाठी यातायात करावी लागत आहे. रेल्वे किंवा महानगर टेलिफोन निगममध्ये मोठ्या प्रमाणावर बिगरमराठी कर्मचारी असल्याने तेथे मराठीच्या वापराबाबत उदासीनता आहे. केंद्रीय आस्थापनांमध्ये त्रिभाषा सूत्र बंधनकारक असले आणि राज्य सरकार मराठीच्या वापरासाठी आग्रही असले तरी, त्याच्या कार्यवाहीसाठी अधिकारी सरकारने नेमलेला नाही. या बिगरमराठी कर्मचाऱ्यांना मराठीचे प्रशिक्षणही दिले जात नाही.